Get Mystery Box with random crypto!

लेख अवश्य वाचावा वैचारिक लेख - काळी पिशवी प्लास्टिकच्या | 🏆IAS मंत्र MISSION 2020🏆

लेख अवश्य वाचावा

वैचारिक लेख - काळी पिशवी

प्लास्टिकच्या 'कॅरीबॅग' आपण कधी वापरायला लागलो माहीत नाही. जसं जन्माला आलो आणि श्वास घ्यायला लागलो, अगदी तसं झालं. या पिशव्यांमध्ये 'काळी पिशवी' विशिष्ट कारणासाठी वापरली जाते. कोणी पाहुण्यांकडे मिठाई किंवा फळं काळ्या पिशवीतून नेत नाहीत. काळी पिशवी कधी आणि कशासाठी वापरायची हे कोणी ठरवले देव जाणे! ज्या गोष्टी चोरून करायच्या आहेत, चारचौघांना कळता कामा नये, ही मिरवण्यासारखी गोष्ट नव्हे; अशा गोष्टींसाठी ही काळी पिशवी वापरली जाते. उदाहरणार्थ दारूच्या बाटल्या, सॅनिटरी नॅपकिन, मासे, मटण, चिकन यासाठी काळी पिशवी वापरतात. इतर गोष्टींचं ठीक आहे पण मासे मटण यासारख्या आहारातल्या गोष्टीत लपवण्यासारखे काही नाही आणि तरी त्यासाठी काळी पिशवी का वापरायची बरं ?
आम्ही लहानपणी चोरून मासे खायचो. आजूबाजूला ब्राह्मणवस्ती होती. वास येऊ नये म्हणून आम्ही नाना तऱ्हा करायचो. अगरबत्त्या काय लावायचो, सगळेजण झोपले की बनवायला घ्यायचो, वास येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या लावायचो. या बाबतीत मोठी माणसं आम्हाला खोटं बोलायला शिकवायची. आमच्या पैशाने आम्ही खाणार होतो मग आम्ही लपवत का होतो?

समाजमन तरी असं की शाकाहारी म्हणजे चांगले आणि मांसाहारी म्हणजे वाईट. अशी काहीतरी विभागणी होती अजूनही थोडीफार आहे ;पण आता काळ बदलला. वातावरण थोडं बदललं.लपवाछपवी थोडी कमी झाली, लपवाछपवीचे विषय बदलले,पद्धती बदलल्या.त्यातली एक पद्धत म्हणजे काळी पिशवी.
लोक काय म्हणतील याची इतकी पर्वा का करायची? कोणाची मुलं सिगरेटी 'फुंकू' लागली, कोणाला थोडं 'घ्यायची' सवय लागली, घरोघरी 'घटस्फोट' होऊ लागले. 'वृद्धाश्रमांची' संख्या वाढली,'स्त्रीभृणहत्या' वाढतेच आहे.
प्रत्येकाच्या घरात पिढी बदलली, धारणा बदली, मोकळेपणा आला; उलट काही गोष्टींचं समर्थन होऊ लागलं ;पण काळी पिशवी गेली असं मात्र झालं नाही. उदाहरणार्थ आता सत्यनारायणाची पूजा होत नसेल पण एक वर्षाच्या मुलाचा अगदी जंगी हॅपी बर्थडे होतो म्हणजेच प्रदर्शन आहेच. आता जात विचारली जात नाही पण हळूच आडनाव विचारलं जातं आणि त्यावरून जातीचा आडाखा बांधला जातो. हुंडा घेत नाहीत पण मुलीकडच्यांना सर्व लग्न खर्च करायला लावतो. आपण कमवलेले पैसे आपल्या मुलींसाठीच खर्च करणार ना किंवा तुमच्या मुलीला घातलेल सोनं तुमचंच आहे असं काहीतरी त्याचं समर्थन होतं. आम्ही असलं काही मानत नाही असं म्हणणारे धार्मिक कार्याच्या वेळी बायका मुलींना पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घ्यायला लावतात. जिवंत असताना आई-वडिलांना छळणारे ते मेल्यानंतर त्यांचे दिवस करतात, श्राद्ध घालतात. पहा! किती न दिसणाऱ्या काळ्या पिशव्या आपण वापरतो आहोत.ज्यांची मनं अस्वच्छ आहे ते सोहळ्याने स्वंयपाक करण्याचा आग्रह धरतात. म्हणजेच आहे पण दाखवायचं नाही. करायचं पण लपून छपून, हे अजूनही चालूच आहे.
आम्ही अजूनही खरे सुधारतं नाही .लपावाछपवी अजून चालूच आहे .ज्यात मुळात लपवण्यासारखे काही असेल तर ते करूच नका ;मग त्यासाठी लहान-मोठ्या काळ्या पिशव्या वापराव्या लागणार नाही. पण दुर्भाग्य हे की लपवाछपवी आम्ही शिकलेले, सुधारलेले लोक एकविसाव्या शतकातही करतो आहोत.काळ्या पिशव्या वापरतो आहोत
.

शुभदा पाटकर
डोंबिवली

@maayboli