Get Mystery Box with random crypto!

*राकेश झुनझुनवाला* *भावपूर्ण श्रध्दांजली* झुनझुनवाला | 🏹आदित्य अकॅडमी🏹

*राकेश झुनझुनवाला*

*भावपूर्ण श्रध्दांजली*

झुनझुनवाला हे नाव जर आपणांस कालपर्यंत माहित नसेल तर आपण भयानक नशा करत आहात हे नक्की! असो तो काही आजचा विषय नाही.

घरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात? त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा होतो.

१९६० साली मुंबईमध्ये एका सामान्य गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि सोबतच त्यांना शेअर मार्केट मध्येदेखील पैसे गुंतवण्याची आवड होती.
मोठे झाल्यावर जेव्हा राकेश भाईंनी त्यांच्या वडिलांकडे शेअर मार्केट मध्येच करिअर करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी नीट शिक्षण घेण्याचा सल्ला दिला म्हणजे नंतर शेअर मार्केटमध्ये नीट जम नाही बसला तरी हातात ठोस काहीतरी पैसे कमावण्याचे साधन राहील.

त्यानुसार त्यांनी १९८५ साली चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा राकेश भाईंनी त्यांचा वडिलांजवळ शेअर मार्केटमध्येच करिअर करायचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हवे ते करिअर करण्याबद्दल सांगितले परंतु आपण कोणतीही आर्थिक मदत करणार नाही असे स्पष्ट सांगितले.

अशा प्रकारे १९८५–८६ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्सच्या व्यवसायास सुरुवात केली. राकेश भाईंकडे गुंतवण्यासाठी फक्त ५००० रुपये होते आणि एवढ्याशा पैशांमध्ये त्यांना फार काही लाभ होऊ शकणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या एका मित्राकडून फिक्स डिपॉझिट मधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळवून देण्याच्या शब्दावर अडीच लाख रुपये मिळवले. राकेशजींना १९८६ ते १९८९ या कालावधीमध्ये साधारण २० ते २५ लाखांपर्यंतचा नफा झाला.यानंतर त्यांना कधीच त्यांच्या शेअर्स बाजारातील करिअर मध्ये मागे वळून पाहण्याची गरज नाही पडली.

आज राकेश झुनझुनवाला यांची स्वतःची “रारे एन्टरप्राइजेस” (Rare Enterprises) नावाची कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांनी स्वतःच्या नावामधील आद्याक्षर ‘रा’ (Rakesh Jhunjhunwala) व त्यांची पत्नी सौ. रेखा (Rekha) यांच्या नावामधील अक्षरे आद्याक्षर ‘रे’ असे एकत्र करून ठेवले आहे.

या सर्व प्रवासात आपल्या कुटुंबाचे आपल्याला कशा प्रकारे सहकार्य लाभले हे सांगताना ते आवर्जून सांगतात की आई-वडील, भाऊ यांच्यासोबतच त्यांची पत्नी त्यांच्या या सर्व वाटचालीत कायम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होती. त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की घरातील प्रत्येक पुरुषमागे एका स्त्रीचे पाठबळ असल्यास तो नक्की यशस्वी होतो.

जास्त कालावधीसाठी पैसे गुंतवणे जास्त लाभ मिळवून देते की कमी कालावधीतील गुंतवणुकीत जास्त नफा होतो असे विचारले असता राकेशजी सांगतात, “कमी कालावधीतील गुंतवणूक कमी कालावधीत लाभ मिळवून देते आणि जास्त कालावधीतील गुंतवणूक ही जास्त कालावधीतील भांडवल गुंतवणुकीच्या दृष्टीने लाभदायी ठरते. माझ्या गुंतवणुकींमधील मूल्यांमुळे मला तांत्रिक विश्लेषण करून त्यानुसार गुंतवणूक नक्की कशामध्ये करायची हे ठरवणे शक्य होते. या दोन्ही प्रकारातील गुंतवणूक एकमेकांच्या साहाय्याने तुम्हाला चांगला लाभ मिळवून देते परंतु हे दोन्ही परस्पर भिन्न प्रकार आहेत.”

श्री. राकेश झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार ज्याला शेअर्स बाजाराबद्दल विशेष आकर्षण आणि रुची असेल त्याला शेअरबाजारात नक्की लाभच होईल कारण तुम्हाला ज्या ही क्षेत्रात विशेष रुची असेल त्या क्षेत्रात तुम्ही कधीही मागे पडत नाही, त्यात तुमची कधीही अधोगती होत नाही.

या लेखात मुद्दामहून आर्थिक बाबींचा जास्त उल्लेख केलेला नाही जेणेकरुन हे सर्वांना नीट कळेल.

आपण यातून काय शिकू शकतो?
१) योग्य वयात योग्य ते प्रश्न निर्माण झाले पाहिजेत.
२) आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळील परंतु ज्याला प्रश्न आणि योग्य उत्तर माहित आहे अशा व्यक्तीला विचारणे.
३) कोणी जर आपल्याला काही प्रश्न विचारत असेल तर त्याला उडवाउडवीचे उत्तर देणे टाळत योग्य उत्तर देणे पण स्पून फिडिंग न करणे.
४) आपल्या आवडीनुसार योग्य वयात करिअर निवडणे.
५) जर यात आपण यशस्वी झालो नाही तर आपल्याकडे प्लान B असणे गरजेचे आहे.