Get Mystery Box with random crypto!

Feelings of one Parent : तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आ | Job Alerts by Rawandale

Feelings of one Parent :

तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना?

अकरावी-बारावीच्या वर्गात(विशेषत: खासगी क्लासेसमध्ये) दाखल केलेल्या मुलांच्या आई वडलांच्या पालकत्वाची सध्या खऱ्या अर्थानं कसोटी लागते आहे. अलीकडे बहुसंख्य पालक मुलांना दहावीनंतर खासगी क्लासेसमध्ये घालतात. आपण इतका खर्च करतो तर मग आपल्या मुलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर तरी व्हावं किंवा IIT/NIT अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून इंजिनीअर तरी व्हावं असं वाटतं. मात्र अशाप्रकारे अवास्तव अपेक्षा करताना आपल्या मुलांच्या क्षमतेचा विचार करायला नको? आपण आपल्या मुलांना कुठं ढकलत आहोत याचं भान ठेवायला लागेल. अलीकडे मुलं हट्टी बनली आहेत. ऐकत नाहीत. मात्र त्यांना धोके नक्की सांगायला पाहिजेत.

JEEसारखी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा मुलांचा दम घेते. दरवर्षी २० लाखांहून अधिक मुलं JEE मेन्स देतात. त्यातले दोन सव्वादोन लाख मुलं अॅडव्हांससाठी पात्र होतात. पैकी ४० हजार मुलं निवडले जातात. पैकी अवघ्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आयआयटीमध्ये मिळतो! बाकी मुलांना NIT, ट्रीपल IT महाविद्यालयां प्रवेश मिळतो. सक्सेस रेट किती आहे? अवघा ५ टक्के! बाकीच्या किती मुलांच्या स्वप्नांचा आशाआकांक्षांचा चुराडा होतो.

परवा NEET ची परीक्षा झाली. असेच भारतभरातली लाखांत मुलं बसली. शेकड्यात मुलं निवडले जातील. निवडयादीत नाव असायला हवं असं मुलं आणि पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु अशी शक्यता आहे का? अजिबात नाही! मर्यादित जागा आणि प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणारे विद्यार्थी... हे अत्यंत विषम आणि त्याहून भीषण वास्तव नजरेआड कसे काय करता येईल? येणारच नाही.

तितक्या ताकदीचं शालेय शिक्षण मिळालं नसेल, संकल्पनाच स्पष्ट नसतील तर अशा कठोर स्पर्धा परीक्षा अनेक मुलांना झेपतच नाहीत. केवळ दहावीत भरपूर मार्क्स मिळाले आहेत म्हणून अव्वाच्या सव्वा अपेक्षा वाढत जातात. कोटा, लातूरसारख्या क्लासेस फॅक्टरीमध्ये मुलं नेऊन घातली की लाखांत पैसे भरले की मुलांनी मार्क्स मशीन म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत अशी अपेक्षा असते. गुंतवणूक आणि परतावा असं कुठं असतं का शिक्षणात?

आधी नमूद केले आहे त्यानुसार JEE, NEET या जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जायला लावणाऱ्या कठोरात कठोर असलेल्या स्पर्धा परीक्षा बहुसंख्य मुलांना झेपतच नाहीत. पालक मात्र अपेक्षा ठेवून असतात.
१. घराबाहेर असलेली मुलं दिवसभर नेमकं काय करतात?
२. मुलांच्या मनात काय सुरु आहे? त्यांचा मनोव्यापार कसा सुरू आहे?
३. पोरांना अभ्यास झेतपोय का?
४. टेस्ट मध्ये मिळालेल्या मार्कांना मुलं नेमका कसा प्रतिसाद देतात?
५. दोन वर्षे अभ्यास एके अभ्यास करावा लागतो. तर मन, मेंदू आणि शरीर शिणून जात असणार. शिवाय ताण असतोच. क्लास आणि रुमबाहेर पडून मुलं हास्यविनोद करत गप्पा मारतात का? धावायला चालायला जातात का? खेळ खेळतात का? एखादं चित्र काढतात का? संगीत ऐकतात का?
६. मुलं पुरेशी झोप/ विश्रांती घेतात का?
७. त्यांचा स्क्रीन टाइम किती आहे?
८. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं पोटभर जेवण करतात का? (कारण जेवण आणि नैराश्याचा जवळचं नातं असतं असं जाणकार सांगतात.)
९. मुलाला समुपदेशनाची गरज आहे का?
समजा संभाव्य ‘अपयशाला‘ सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसेल तर मात्र कुटुंबातला आणखी सीन बिकट बनत जातो.

परवा NEETची परीक्षा झाली. अपेक्षित मार्क्स न मिळण्याच्या भीतीनं माझ्या माहितीतील काही मुलं ताणात आणि त्रासात आहेत. वर डोकं काढायला क्लासेस फॅक्टरी मुलांना घडीची उसंत देत नाही. शिकवायचं कमी अन टेस्टच जास्त! गंभीर विनोद असा की, NEET आणि JEE आणि CET अशा सगळ्या परीक्षा मुलं देऊन बघतात!
या सगळ्यात मुलांचं काय होत असेल? याचं त्यांना घंटा काही पडलेलं नाहीये. अतिरिक्त अकादमीक ताणाशी कसं डील करायचं? मुलांना उमजत नाही. अनेक पालकांना मुलांचं मन जाणून त्यांच्याशी संवाद साधायचं कौशल्य आत्मसात नसते. पालकांना दोष द्यायचा नाही. काही मुलांच्या स्वतः कडून अपेक्षा वाढलेल्या असतात. पिअर्स प्रेशर असतं. यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या तसेच क्लासेसच्या कॅम्पसमध्ये समुपदेशक आवश्यक नव्हे, अनिवार्य बनले आहेत.... मानसिक आरोग्याकडे शिक्षक, पालक यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अनेक मुलांना त्रास होतो आहे. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी स्थिती आहे.

तेव्हा पालकांनो,
वेळीच सावध व्हा. सावध ऐका पुढल्या हाका. ही स्पर्धा असणार आहेच. मात्र त्याकडे बघायची आपली आणि आपल्या मुलांची दृष्टी आणि भूमिका कमवाला लागेल. NEET आणि JEE म्हणजेच डॉक्टर आणि इंजिनीअर यांच्या पुढे मागे करिअरची अनेक क्षेत्रं आहेत. बेकारी, बेरोजगारी चरमसीमेवर पोहोचली आहे. भारतीय युवकांमध्ये असलेले नैराश्य मोठी समस्या बनून उभी राहिली आहे.